अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी सांगितले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.’
यावेळी अर्थमंत्र्यांनी शिक्षण खात्यासाठी मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी येत्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स स्थापन केल्या जाणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या, ‘जिज्ञासा आणि नावीन्यतेची भावना जोपासण्यासाठी आणि तरुण मनांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढवण्यासाठी तसच मुलं आणि तरूणांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यासाठी, अटल टिंकरिंग लॅबचा वापर महत्वाचा आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
अटल टिंकरिंग लॅब काय आहे ?
अटल टिंकरिंग लॅब (एटीएल) ही विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील कौशल्ये शिकण्यासाठी उपलब्ध करून देणारी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना नवीन कल्पना विकसित करण्यासाठी साधने आणि उपकरणे उपलब्ध असतात.
अटल टिंकरिंग लॅब (ATL) भारत सरकार द्वारे देशातील शिक्षा व्यवस्थेत पॅराडाइम शिफ्ट आणण्याच्या उद्देश्याने लाँच करण्यात आलेली योजना आहे. विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, क्रिएटिव्हीटी आणि वैज्ञानिक दृष्टीकोणास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
एडोबी, अमेझॉन, इंटेल, माइक्रोसॉफ्ट आणि आयबीएम सारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय टेक कंपन्या केंद्र सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशनमध्ये भागीदार आहेत. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत.
या प्रयोगशाळा 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्स सायन्समधील नव्या तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना अवगत करण्यास मदत करतील.
अटल टिंकरिंग लॅब्सची वैशिष्ट्ये
-या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना डू-इट-योरसेल्फ पद्धतीने काम करण्याची संधी मिळते.
-विद्यार्थ्यांना नवीन कल्पना विकसित करण्यासाठी साधने आणि उपकरणे उपलब्ध असतात.
-विद्यार्थ्यांना STEM (Science, technology, engineering, and mathematics) क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते.