PM Modi : प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभ (Mahakumbh 2025) सोहळ्याला उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान महाकुंभमेळ्यात तर सहभागी होणारच आहेत पण संगमावर ते पवित्र स्नान देखील करतील. ज्याला महाकुंभ सोहळ्यात विशेष महत्व आहे.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो आहे. कारण महाकुंभमेळा हा हिंदू धर्माचा एक मोठा आणि पवित्र सोहळा आहे. या सोहळ्याला प्रत्येक वेळी करोडो भाविक येतात आणि संगमात स्नान करतात. पंतप्रधान मोदींचा हा दौरा विशेषत: महाकुंभ मेळ्याचे धार्मिक महत्त्व वाढवण्यासाठी आणि राज्याच्या धार्मिक वारसा जपण्यासाठी महत्वाचा असेल.
प्रयागराज येथील दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी अनेक प्रमुख कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. उद्या पंतप्रधान सकाळी 10 वाजता प्रयागराज विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते महाकुंभ सोहळ्यात सहभागी होतील व संगम घाटाकडे जातील. जिथे ते बोटीने संगमच्या पवित्र स्थळी पोहोचतील. संगम म्हणजे जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या एकत्र येतात. जे हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे आणि ते महाकुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण आहे. याठिकाणी पंतप्रधान स्नान करतील.
सकाळी 11 ते 11.30 या वेळेत पंतप्रधान मोदींचे पवित्र स्नान होईल. ही वेळ खासकरून पंतप्रधानांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यावेळी ते संगमात स्नान करून धार्मिक विधींमध्ये सहभागी होतील. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे महाकुंभातील हा वेळ विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. आंघोळीनंतर पंतप्रधान बोटीने आरेल घाटावर परततील, तेथून ते डीपीएस हेलिपॅडकडे रवाना होतील. यानंतर पंतप्रधान प्रयागराज विमानतळावर जातील आणि तेथून दुपारी 12.30 वाजता हवाई दलाच्या विमानाने प्रयागराजहून परततील.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींसोबत उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक अत्यंत तंतोतंत पाळले जाणार आहे. या भेटीमुळे पंतप्रधान मोदींच्या मनात भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दल असलेला आदर दिसून येतो. तसंच, हा सोहळा महाकुंभमेळ्यातील भाविकांमध्ये सरकारचा पाठिंबा आणि सहभाग दर्शवतो. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे महाकुंभात गर्दी होण्याची शक्यता आहे. याची दक्षता घेत उद्या महाकुंभात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे.