नुकतंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिकेच्या भेटीला जाणार आहेत. या दौऱ्यावेळी अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मोदींना आमंत्रित केले होते. ट्रम्प यांचे आमंत्रण स्वीकारून पंतप्रधान लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान अमेरिकेला जाण्यापूर्वी पॅरिसचा दौरा करणार आहेत. पॅरिस दौरा संपवून ते 12 आणि 13 फेब्रुवारी असे दोन दिवस अमेरिकाचा दौरा करतील. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. त्यामुळे हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार, संरक्षण व तंत्रज्ञान सहकार्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकतात.
ट्रम्प यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राजधानी वॉशिंग्टन डीसीला भेट देणाऱ्या काही जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा देखील समावेश आहे. ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर एका आठवड्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर संभाषण झालं होत. नंतर या संभाषणाची माहिती देताना ट्रम्प यांनी आशा व्यक्त केली होती की या फेब्रुवारीमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट होऊ शकते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे खास पत्रही ट्रम्प यांना सुपूर्द केले होते.