उत्तराखंडमध्ये 27 जानेवारी 2025 पासून समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे. देशात समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलं आहे. आता उत्तराखंडनंतर भाजपशासित आणखी एका राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात सरकार मंगळवारी समान नागरी कायदा लागू करण्याबाबत घोषणा करू शकते.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी दुपारी पत्रकार परिषदेतबोलवत राज्यात UCC बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. गुजरातला भाजपचा बालेकिल्लाही मानला जातो. गेल्या 30 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. अशातच आता आणखी एका भाजप शासित राज्यात UCC कायदा लागू केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात UCC लागू करण्याची घोषणा केली. आता त्यांच्या नंतर गुजरातचे मुख्यमंत्री देखील असा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
UCC कायदा लागू केला तर काय बदल होतील ?
-सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समान अधिकार आणि न्याय मिळेल.
-महिलांना त्यांच्या धर्मानुसार भेदभाव न होता समान हक्क मिळेल.
-विवाह आणि घटस्फोटासाठी कायदा समान असेल. लग्नाचे योग्य वय असेल तेव्हाच लग्नासाठी परवानगी असेल.
-UCC नुसार, पुरुषाचे कायदेशीर विवाह वय 21 वर्षे आणि महिलेचे वय 18 वर्षे असावे.
-UCC देखील 60 दिवसांच्या आत विवाह नोंदणी अनिवार्य करते. पण, UCC कायदा असंही सांगतो की, विवाह केवळ नोंदणीकृत नसल्यामुळे अवैध ठरणार नाही.
-ज्या व्यक्तींनी नियमांनुसार आधीच त्यांचे लग्न नोंदणीकृत केले आहे त्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक नाही, परंतु पोचपावती सादर करणे आवश्यक आहे.
-विवाह नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते.
-लिव्ह इन रिलेशनशिपमधून एखाद्या मुलाचा जन्म झाला तर त्याला लग्नानंतर होणाऱ्या मुलांसारखेच सर्व कायदेशीर अधिकार त्याला असतील.
-मुलींना मुलांच्या बरोबरीनं वारसा हक्क मिळेल.
-बहूपत्नीत्व आणि हलाला प्रथेवर बंदी इत्यादी…