ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे . द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते लवकरच या आजारातून कमबॅक करत घरी परततील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पुस्तकांच्या माध्यमातून द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रीडा विषय सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचे काम प्रामुख्याने केले. क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनेल्सवर नियमितपणे दिसत होते. द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले, सुरवातीला त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली. 1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये 1983चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.
द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. तसेच स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.