बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार शेख हसीना यांच्या समर्थकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतरिम सरकारच्या आदेशानंतर बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांनी ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना लक्ष्य केले जात आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत 1308 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अंतरिम सरकार मधल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘या मोहिमेअंतर्गत शेख हसीना यांचा शेवटचा समर्थक जो पर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहील. असं त्यांनी म्हंटल आहे.
ढाकाच्या बाहेरील आवामी लीग नेत्याच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या तोडफोडीदरम्यान विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाल्यानंतर मुख्य सल्लागारांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनाने ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ला अधिकृत मान्यता दिली होती. ढाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत काल रात्रीपर्यंत एकूण 1308 संशयितांना अटक करण्यात आली आहे.
‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ म्हणजे काय?
या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘शेख हसीना यांचे समर्थक आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पुढे वाढू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’ अंतर्गत कोणत्याही नागरिकांना अन्याय सहन करावा लागणार नाही, मात्र हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
गृह मंत्रालयाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. देशातील स्थिरता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ‘ऑपरेशन डेव्हिल हंट’च्या पुढील टप्प्यांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, ‘या मोहिमेत केवळ पोलीसच नव्हे तर बांगलादेश लष्कर, नौदल, हवाई दल, बॉर्डर गार्ड बांगलादेश, अंसार आणि तटरक्षक दलाचे जवानही असणार आहेत.