अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी अनेक मोठी कामे हाती घेतली आहे. नुकतंच त्यांच्या मध्यस्थीने इस्राईल आणि दहशदवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाला पूर्णविराम लागला आहे. अशातच आता ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबवण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी नुकतीच युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या संघर्षावर चर्चा केली आहे.
याविषयी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे. ‘”रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी नुकतेच माझे फोनवर संभाषण झाले आहे. आम्ही अनेक मुद्दयांवर चर्चा केली आहे. युक्रेन, मध्य पूर्व, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, डॉलरची ताकद आणि इतर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.
पुढे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, मुख्य म्हणजे आम्ही रशिया-युक्रेन युद्धबाबत देखील चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या युद्धबंदीवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यास संमती दर्शवली आहे. मला ही चर्चा यशस्वी होईल असे वाटते. अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी देखील दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे. या चर्चेनंतर झेलेन्स्की यांनी देखील दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करणार असल्याचं सोशल मीडियावर घोषित केलं आहे. झेलेन्स्की यांनी एक्स वर लिहिले की, ‘रशियन आक्रमकता थांबवण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांतता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी ट्रम्प यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली.’