आयपीएल मधली सर्वात जास्त फॅन फॉलोयिंग असणारी टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टीमने आगामी आयपीएल हंगामासाठी नवीन कर्णधारांची घोषणा केली आहे. आता आरसीबीचे कर्णधारपद रजत पाटीदारला दिलं आहे. आता आरसीबी पाटीदारच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीचे नाव कर्णधारपदाच्या चर्चेत होते. पण संघ व्यवस्थापनाने पाटीदारचे नाव जाहीर केले.
सय्यद मुश्ताक अली करंडक व विजय हजारे करंडक स्पर्धेत मध्य प्रदेशचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव पाटीदारकडे आहे. 31 वर्षीय पाटिदारने आपल्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशला सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले होते, परंतु अंतिम सामन्यात संघाला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला.
पाटीदार आता आरसीबीचा आठवा कर्णधार असेल. आयपीएल 2021 हंगामानंतर पटिदारला सोडण्यात आले होते. परंतु 2022 मध्ये त्याला पुन्हा एकदा टीममध्ये सामील करून घेतले. गेल्या आयपीएल हंगामात पाटीदार चांगल्या फॉर्मात होता. 2024 च्या हंगामात त्याने आरसीबीकडून 15 सामने सामने खेळले या सामन्यांमध्ये त्याने 395 धावा केल्या. यात पाच अर्धशतकांचाही समावेश आहे
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर 2022 पासून संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिस करत होता. परंतु या हंगामाच्या आधी फ्रँचायझीने त्याला सोडले आहे. आरसीबीने मेगा लिलावाच्या आधीच डू प्लेसिसला रिलीज केले होते. 40 वर्षीय डू प्लेसिस यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
आतापर्यंत कधीही आयपीएलचे विजेतेपद न पटकावणाऱ्या संघांपैकी आरसीबी हा एक संघ आहे. हा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि 2016 मध्ये शेवटचा विजेतेपदाचा सामना खेळला होता. गेल्या पाच हंगामात आरसीबीने चार वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या हंगामाच्या खराब सुरुवातीनंतर संघाने पुन्हा पुनरागमन केले. परंतु एलिमिनेटरमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता पाटीदारच्या नेतृत्वाखाली टीमला जिंकण्याची आशा असेल.