केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (14 फेब्रुवारी 2025) महाराष्ट्रात तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये नवीन फौजदारी कायदा लवकरात लवकर लागू करण्यास सांगितले आहे.
या आढावा बैठकीत अमित शहा यांनी महाराष्ट्र सरकारला नवीन फौजदारी कायद्यांनुसार आदर्श संचालनालय, अभियोजन संस्था तयार करण्यास सांगितले आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आणि पोलीस, तुरुंग, न्यायालये, खटला आणि न्यायवैद्यकशास्त्र यांच्याशी संबंधित विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला आहे.
चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हंटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यांअंतर्गत एफआयआर दाखल केल्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत तीन वर्षांच्या आत कोणत्याही प्रकरणात न्यायाची तरतूद करण्यात आहे.
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पारिषदेत त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन नवीन कायद्यांचा आढावा घेतला आहे आणि त्यासाठी आम्ही कशी तयारी केली आहे याचा आढावा त्यांनी घेतला आहे. एकंदरीत, ही एक चांगली आढावा बैठक होती. आम्ही राज्यात चांगला कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करू ‘. असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही महिन्यांत अमित शहा यांनी तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात इतर राज्यांसोबत अशाच बैठका घेतल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात त्यांनी यापूर्वी बैठका घेतल्या आहेत.