अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खास भेट दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये १३ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे होतील यावर देखील चर्चा झाली. याचदरम्यान, ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना एक विशेष भेट देखील दिली.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना त्यांनी स्वाक्षरी केलेले ‘अवर जर्नी टुगेदर’ फोटोबुक भेट म्हणून दिले आहे. या फोटोबुकमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळातल्या महत्त्वाच्या घटना आणि समारंभांची छायाचित्रे आहेत. त्यात सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यानचे देखील फोटो आहेत. ही फोटोबुक दोन्ही नेत्यांमध्ये असलेली घट्ट मैत्री दर्शवते.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदे घेतली. यादरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोदींना ही भेट दिली. या भेटवस्तूवर ट्रम्प यांनी लिहिले आहे की, “पंतप्रधान महोदय, तुम्ही महान आहात.”
यादरम्यान, ट्रम्प यांनी 2020 मध्ये केलेल्या भारत दौऱ्यादरम्यानची ‘नमस्ते ट्रम्प रॅली’ची काही छायाचित्रे दाखवली आहेत.
मोदींच्या दौऱ्यावर ट्रम्प काय म्हणाले?
भारताच्या पंतप्रधानांनी इथं येणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना हे सांगितले. पुढे ट्रम्प म्हणाले, मोदी हे बराच काळ माझे चांगले मित्र राहिले आहेत. आम्ही एक मजबूत संबंध तयार केले आहेत आणि आमच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात ते संबंध कायम ठेवले आहेत.’