विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता भाजप दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे विधानसभेत मिळालेल्या पराभवानंतर आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पार्टीचे तीन नगरसेवक भाजपच्या गोटात सामील झाले आहेत.
दिल्लीतील अँड्र्यूज गंजमधील नगरसेविका अनिता बसोया, आरकेपूरमचे नगरसेवक धर्मवीर आणि चपराना प्रभाग क्रमांक 152 चे नगरसेवक निखिल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजपने ‘आप’ला महापालिकेत हादरे देण्यास सुरुवात केली आहे.
विधानसभेतील विजयानंतर भाजपाची आगामी महापालिका निवडणुकीवर नजर आहे. दिल्लीत महापौरपदाची निवडणूक एप्रिलमध्ये होणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत आम आदमी पक्षाने तीन मतांनी विजय मिळवला होता.
मात्र, आता आपच्या तीन नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानं आपचं संख्याबळ कमी झालेल दिसत आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी बाकी असता आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्लीतील आपच्या पराभवानंतर आता पक्षपातील अनेक नेते भाजपच्या मार्गावर चालत असल्याचे चित्र दिसत आहे. जे ‘आप’साठी धोक्याचे चिन्ह आहे.