कोकणातली शिवसेना दुबळी होत चालली आहे. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते. यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट अजूनच दुबळा झाल्याचं बोललं जातंय.
शिवसेना ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय पडते यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय असं संजय पडते यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
संजय पडते यांनी राजीनामा पत्रात काय काय म्हटलंय?
प्रति,
माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरेसाहेब,
शिवसेना पक्षप्रमुख
मी श्री. संजय धोंडदेव पडते, जिल्हाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेव ठाकरे) 1985 सालापासून बाळसाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे. आपल्याच नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद…! सद्यस्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्दा पक्षांतर्गत सुरु असलेल्या घडामोंडीमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन, आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे, असं संजय पडते यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का :-
शिवसेना ठाकरे गटाला कोकणात धक्का बसला आहे. काही दिवसांआधी माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर माजी आमदार वैभव नाईक देखील शिंदे गटात प्रवेश करतील, असं खळबळजनक विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. त्यामुळे वैभव नाईक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.