केरळमध्ये मंगळवारी रात्री एक मोठा अपघात झाला आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील अरीकोड शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान 50 हून अधिक प्रेक्षक आगीच्या चपाट्यात आल्याची घटना घडली आहे.
फुटबॉल सामन्यापूर्वी आयोजकांनी इथं जोरदार फटाकेबाजी केली. यादरम्यान, फटाके नियंत्रणाबाहेर गेले व स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये फटाके फुटू लागले. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि लोक इकडे तिकडे पळू लागले. सुदैवाने या घटनेत कोणीही जीवित हानी झाली नाही. मात्र, अनेकजण यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
https://twitter.com/TheSouthfirst/status/1891905055944806617
पोलीस काय म्हणाले?
या घटनेवर पोलिसांनी माहिती देताना सांगितले, ‘मलप्पुरम जिल्ह्यात, अरीकोड परिसरातील एका स्टेडियममध्ये सेव्हन्स फुटबॉल सामन्यादरम्यान फटाके फोडण्यात आल्याने 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर कोणीही या आगीत गंभीर जखमी झाले नाहीत. सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी ही घटना घडली. आयोजकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 288 (स्फोटक पदार्थाच्या संदर्भात निष्काळजीपणा) आणि 125 (बी) (इतरांचे जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारी कृती) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’ असं पोलिसांनी सांगितलं आहे.