दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २७ वर्षांनी मिळवलेल्या लक्षणीय विजयानंतर भारतीय जनता पक्षाने अखेर बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले आणि आज दिल्लीच्या मुख्यमंत्रपदाचा शपथविधी सोहळा देखील पार पडला.
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेतली आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या आधी अतिशी मार्लेन, सुषमा स्वराज, शीला दीक्षित या दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत.
दरम्यान, रेखा गुप्ता यांच्यानंतर मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रेखा गुप्ता यांच्यासह प्रवेश वर्मा यांनी दिल्लीच्या मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.
कोण आहेत रेखा गुप्ता?
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षा आणि पहिल्यांदाच आमदार राहिलेल्या रेखा गुप्ता यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून दिल्ली विधानसभेवर निवडून आल्या होत्या. भाजपची सत्ता असलेल्या कोणत्याही राज्यातील त्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. त्या दोन वेळा दिल्लीच्या कौन्सिलर आणि महापौर देखील राहिल्या आहेत.