राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशातच काल देखील एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ई-मेलद्वारे शिंदे यांच्या शासकीय गाडीवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईतील जवळ-जवळ 7 ते 8 पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा मेल करण्यात आला होता.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलसांनी ताबडतोब अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा शोध सुरु केला. या प्रकरणी आता मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले दोघेही नात्याने ‘आतेभाऊ-मामभाऊ’ आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे मंगेश अच्युतराव वायाळ आणि अभय गजानन शिंगणे अशी आहेत. यातील मंगेश हा ट्रक चालक असून, तर अभय याचे मोबाईल शॉप आहे. अभय शिंगणे याच्या मोबाईलच्या दुकानातून हा धमकीचा ई-मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, या दोघांनी आपसातील वादातून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. या दोघांनी एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी का दिली? यामागे काय हेतू होता? कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भात अलर्ट देण्यात आला आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना अशा धमक्या वारंवार येत आहेत.