‘मराठी टिकवणं आवश्यक आहे त्यासाठी दहावीपर्यंत मुलांना मराठी माध्यमांत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत.’ असं मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात शुक्रवारी नमूद केलं आहे.
शुक्रवारी नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. विज्ञान भवन येथे झालेल्या या समारंभात मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, संमेलन संयोजन आणि सरहद संस्थेचे प्रमुख नहार अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, ‘मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरुर करावा, कविता म्हणाव्यात. पण त्याचवेळी व्यावहारिक गोष्टी विचारात घेणं महत्त्वाचं आहे. तसंच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दहावीपर्यंतचं शिक्षण ते मराठी माध्यमांतूनच झालं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवलं जातं, पण ते दुय्यम मराठी म्हणून वेगळं पुस्तकं केली जातात. मराठी मुलं ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळांमधून उच्च मराठीचीच पुस्तकं असली पाहिजेत. इंग्रजी माध्यमांची शाळा असली तरीही, मी शिक्षण क्षेत्रात ४५ वर्षे काम केल्यानंतर मी सांगते आहे. महाविद्यालयांमधून जे शिकवलं जातं त्यांनंतर जे शिक्षक तयार होतात त्यांना तासिका तत्त्वावर शिकवावं लागतं. मराठी माध्यमांतून शिक्षण दिलं जाणं ही आमची प्रमुख मागणी आहे. ज्या पालकांचा गैरसमज असेल की मराठीतून शिक्षण घेतल्यावर पोटापाण्याची नीट सोय होत नाही त्यांचा अपसमज दूर करणं आवश्यक आहे.’ असं डॉ. तारा भवाळकर यावेळी म्हणाल्या आहेत.