नुकतच काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्या गँगमधल्या एका सदस्याकडून पुण्यातील भाजप नेते व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेनंतर मंत्री मोहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलच फैलावर घेतल होतं आणि बरंच सुनावलं देखील होतं.त्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर येत याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. आता त्यांची एकंदरितच गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यासंदर्भात माहिती मागवण्याचं काम आहे.
दरम्यान, पोलिसांनी या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढली. पुणे पोलिसांकडून धिंड काढण्यात आलेले आरोपी हे कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीतील सदस्य असून या गुंडांची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने व आरोपींना जरब बसावा म्हणून पोलिसांनी ही धिंड काढली. हाताला बेड्या आणि तोंडाला काळ कापड घालून पोलिसांनी तिघांनाही शहरातून फिरवल. सध्या पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. तर अद्याप एक जण फरार आहे, फरार असलेला आरोपी हा गुंड गज्या मारणेचा भाचा असल्याचा माहिती आहे. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी या तरूणाला व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला होता, त्याची विचारपुस केली होती, त्यानंतर आता मोहोळ यांनी पुण्यात आल्यानंतर देवेंद्र जोग या तरुणाची घरी जाऊन भेट घेऊन विचारपूस दखील केली आहे. तसेच, पुणे पोलिसांना जोरदार खडसावल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर, पोलीस कठोर कारवाई करत असल्याचे दिसून येते.
पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, पुणे पोलीस डोळे बंद करुन बसलेत का? अशा भाषेत मोहोळ यांनी समाचार घेतला होता. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी तीन आरोपींची पुणे शहरातील कोथरूड परिसरातून धिंड काढल्याने टोळी गँगमध्ये पोलिसांची चांगलीच जरब बसली आहे.