देशाला शाश्वत व हरित ऊर्जा साधनांनी सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकराने प्रथमच देशात बॅटरी आधारित मालवाहू जहाज बनवण्याची योजना आखली आहे. लवकरच ही जहाज तयार करणार असलायची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. हे जहाज तब्बल 3 हजार टन माल वाहून नेण्यासाठी सक्षम असेल असं देखील सांगण्यात आलं आहे.
नुकतीच देशाला हरित जहाज व हरित समुद्री क्षेत्राचे केंद्र करण्यासंबंधी बैठक पार पडली. ही बैठक केंद्रीय जहाज बांधणी व बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली. या बैठकीत या जहाजाबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच लवकरच बॅटरी आधारित मालवाहू जहाजाची बांधणी सुरु केली जाईल याची देखील घोषणा करण्यात आली.
बॅटरीआधारित देशातील या पहिल्या मालवाहू जहाजाची घोषणा मुंबई बंदरात कार्यरत असलेल्या एसएसआर मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून करण्यात आली आहे.
‘कोणतेही मालवाहू जहाज हे एरव्ही 100 टक्के डिझेलवर चालते. यामध्ये डिझेलद्वारे तयार होणारी वीज बॅटरीत साठवली जाणार असल्याने डिझेल व इलेक्ट्रिक, अशी दोन्ही इंधन किंवा ऊर्जा साधने जहाज चालविण्यासाठी उपलब्ध असतील.
यामुळे 10 टक्के इंधनाची बचत होऊन तितके कार्बन उत्सर्जन कमी होईल. 2047 पर्यंत ‘विकसित भारता’चे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने हे सागरी क्षेत्रातील पहिले मोठे पाऊल आहे’ असे ‘एसएसआर मरीन’चे संजीव अग्रवाल यांनी या परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे.
भारतात अशाप्रकारचे तंत्रज्ञान सध्या केवळ पाणबुड्यांमध्ये वापरले जाते. आता मालवाहू जहाजात देखील हे तंत्रज्ञान आणण्याची तयारी केंद्राकडून सुरु आहे.