दिल्ली विधानसभा अधिवेशनात आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. उपराज्यपाल व्ही के सक्सेना हे सभागृहात भाषण करत असताना आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांनी गोंधळ घातला. हा गदारोळ एवढा वाढला की, शेवटी विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधीपक्ष नेत्या आतिशी यांच्यासह आपच्या 12 आमदारांचं संपूर्ण दिवसासाठी निलंबन करत सभागृहाबाहेर केले.
दिल्ली विधानसभेत दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू असताना उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचे सभागृहात भाषण सुरू होते, यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोधळ घालायला सुरुवात केली. सोबतच घोषणाबाजी देखील सुरु केली. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी कारवाई करत आमदारांचं निलंबन केलं.
दरम्यान, सभागृहाबाहेर करण्यात आलेल्या आपच्या आमदारांनी हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विधानसभेबाहेर निदर्शने केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आतिशी म्हणाल्या, “भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हटवला आहे. मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा कार्यालय आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. याचा निषेध असून जोपर्यंत डॉ. बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही तो पर्यंत निषेध करत राहणार.”
या सर्व गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित करण्यात आले होते.
दुसरीकडे आजच मागील आप सरकारच्या कामगिरीवर भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांचे १४ प्रलंबित अहवाल सादर करण्यात येणार आहेत. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी गेल्या गुरुवारी घोषणा केली होती की, नवीन सरकारच्या पहिल्या अधिवेशनात हे अहवाल सादर केले जातील. यानुसार ते आज सादर केले जाणार आहेत.