मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली आहे .
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबियांनी या संदर्भात केलेल्या अनेक मागण्यापैकी ही एक मुख्य मागणी मान्य झाल्याने देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी समाधान समाधान व्यक्त केलं असले तरी इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत ग्रामस्थांनी मंगळवारी(२४ फेब्रुवारी )अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आज(26 फेब्रुवारी) आंदोलनाचा दुसरा दिवस असून संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करत या दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. जोपर्यंत मागण्याविषयी आश्वासन मिळत नाही. जबाबदार अधिकारी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. वेळप्रसंगी पाणी न घेण्याचा इशारा देशमुख कुटुंबियांनी दिला. आता आज या ठिकाणी अधिकारी भेट देतात का? या आंदोलकाच्या मागण्या विषयी सकारात्मकता दाखवत त्या दिशेने पावले उचलतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या 7 प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
1) केजचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.
2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा.
3) याप्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.
4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.
5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.
6) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून सहआरोपी करा.
7) घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करा.