अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धडाडीचे निर्णय घेण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत.त्यातच ट्रम्प सरकार आता लवकरच गोल्ड कार्ड योजना सुरू करणार आहे. ही योजना ग्रीन कार्डच्या धर्तीवर सुरू करण्यात येत असून त्यात अतिरिक्त लाभही दिला जाणार आहे. या योजनेमुळे अमेरिकेत नागरिकता घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, आम्ही लवकरच गोल्ड कार्ड विकणार आहोत. हे ग्रीन कार्डसारखेच गोल्ड कार्ड असेल. त्याची किंमत ५ मिलियन डॉलर इतकी असेल. या कार्डच्या माध्यमातून ग्रीन कार्डसारखेच लाभ दिले जातील त्याशिवाय काही अतिरिक्त लाभही मिळणार आहेत. पुढील २ आठवड्यात ही योजना सुरू केली जाईल. त्यासाठी संसदेत मान्यता मिळण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय गोल्ड कार्डच्या माध्यमातून रशियातील श्रीमंत, अब्जाधीशही अमेरिकेचं नागरिकत्व घेऊ शकतात का असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना करण्यात आला. त्यावर शक्यता आहे, मी काही रशियातील अब्जाधीशांना ओळखतो, ते खूप चांगले आहेत, तेदेखील गोल्ड कार्ड मिळवू शकतात असं डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले. त्यातून ते अधिक श्रीमंत आणि यशस्वी होतील. त्यासाठी त्यांना खूप पैसा खर्च करावा लागेल आणि खूप करही भरावा लागेल. ही योजना चांगली यशस्वी होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या गोल्ड कार्डसाठी ५ मिलियन डॉलर म्हणजेच ५० लाख डॉलर रक्कम खर्च करावे लागतील. भारतीय चलनात ही रक्कम ४३ कोटी इतकी आहे. गोल्ड कार्ड हे एकप्रकारे ग्रीन कार्डसारखेच असेल. नवीन गोल्ड कार्ड योजना EB-5 योजनेची जागा घेईल. गोल्ड कार्डमधून मिळणारी रक्कम थेट सरकारच्या तिजोरीत जाईल. गोल्ड कार्ड योजनेमुळे आम्ही EB-5 योजना संपुष्टात आणत आहोत असं ट्रम्प प्रशासनातील वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले आहे .