आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी मोजली गेली. गुवाहाटी आणि राज्याच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2:25 वाजता हा भूकंप झाला. आसाम देशातील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक असून त्याचा सिस्मिक झोन 5 मध्ये समावेश होतो.
आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचा प्रभाव दिसून आला. गुवाहाटी, नागाव आणि तेजपूरमध्ये लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. सोशल मीडियावर अनेकांनी जोरदार भूकंप जाणवल्याचा उल्लेख केला आहे. भूकंपामुळे घरातील पंखे आणि खिडक्या थरथरू लागल्या. काही भागात लोक घराबाहेर पडले. गेल्या काही वर्षांत या भागात अनेक मोठे भूकंप झाले आहेत. यापूर्वी 1950 मध्ये आसाम-तिबेट भूकंप (8.6 तीव्रता) आणि 1897 मध्ये शिलाँग भूकंप (8.1 तीव्रता) हे इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक आहेत. दरम्यान आसाममधील भूकंपाच्या 2 दिवस आधी बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के बसले होते. बंगालच्या उपसागरात झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 मोजण्यात आली होती. हा भूकंप 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:10 वाजता झाला होता. बंगालच्या उपसागरात ते 91 किलोमीटर खोलवर हा भूकंप झाल्याचे एनसीएसने म्हंटले आहे.