गेले काही दिवस मुंबईतील तापमान ३७ अंशांपार नोंदले जात आहे. तर राज्यात मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे (३८.४ अंश से.) झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, तसेच कोकण किनारपट्टीच्या परिसरात तापमानात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई तसेच कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.तसेच उष्णतेची लाट असताना विशिष्ट काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली. साधारणपणे मार्च महिन्यात मुंबई आणि परिसरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच इतके ऊन वाढल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही उष्णता नेहमीसारखी दिसून येत नाही. दरम्यान, पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईत ही स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यापूर्वी मुंबईत १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८.८ अंश सेल्सिअस, २३ फेब्रुवारी २०१५ रोजी ३८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतील फेब्रुवारीमधील विक्रमी तापमानाची नोंद २५ फेब्रुवारी १९६६ रोजी झाली होती. तेव्हा कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले होते.
उष्णतेची लाट जेव्हा एखाद्या मैदानी प्रदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक, किनारपट्टी भागांत ३७ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि डोंगराळ भागांत ३० अंश किंवा त्याहून अधिक असल्यास उष्णतेची लाट आल्याचे घोषित केले जाते. एखाद्या ठिकाणी सरासरी कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान सलग तीन दिवस ३ अंश सेल्सिअसने जास्त असल्यास उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. तसेच सलग दोन दिवस एखाद्या ठिकाणी तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त असेल तर त्यासही उष्णतेची लाट आली असे मानतात. तापमान ४७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास तीव्र उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. साधारणपणे पूर्वमोसमी काळात, म्हणजेच मार्च ते जून या महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येतात. अपवादात्मक स्थितीत जुलैपर्यंत उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो. तसेच फेब्रुवारीत उष्णतेची लाट सहसा दिसून येत नाही.