सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा आहे. या दोन नेत्यांच्या वादाचा व्हिडिओ सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. खरंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे शुक्रवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली. मात्र, या भेटीतच दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगल्याचा दिसला.
खरं तर या महत्वाच्या भेटीदरम्यान खनिज करार होईल आणि रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम मिळेल. आणि यात अमेरिकेचा पाठिंबा वाढेल अशी आशा या भेटीमधून व्यक्त केली जात होती. मात्र, या भेटीत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमधील झालेल्या या औपचारिक बैठकीने वेगळेच वळण घेतले.
दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेल्या संभाषणाचे रूपांतर थोड्याच वेळात वादविवादात झाले. ज्यामुळे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस सोडावे लागले. व्हाईट हाऊसच्या इतिहासात दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये एवढ्या तणावपूर्ण संभाषणाची ही पहिलीच वेळ होती.
https://x.com/ARanganathan72/status/1895542212748067007
शक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेत पोहचले त्यानंतर त्यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली. तिथे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष झेलेन्स्की यांचे स्वागत केले. पुढे दोन्ही नेते व्हाईट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये चर्चेसाठी पोहोचले.
या बैठकीत पत्रकार देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्दयांवर चर्चा सुरु होती. या चर्चेत ट्रम्प यांनी रशियाशी करारात युक्रेनला नमते घ्यावे लागेल असा इशारा दिला.
मात्र, युक्रेनकडून हा इशारा धुडकावून लावण्यात आला आणि तिथेच दोन्ही देशात वादाची ठिणगी पडली. आणि दोन्ही नेत्यांमध्ये कॅमेरासमोर वाकयुद्ध रंगले.
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना युद्धाचे फोटो दाखवले. व शांतता करारात पुतिन यांच्यासोबत कोणतीही तडजोड होऊ नये असे सांगितले, यावर ट्रम्प म्हणाले, ‘आम्हाला हे युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. आशा आहे की आम्हाला अधिक सैन्य पाठवावे लागणार नाही. मी खनिज सौद्याचे कौतुक करतो कारण आम्हाला त्याची गरज होती. मी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी समन्वय साधला नसता तर कोणताही करार होऊ शकला नसता.’
याचदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगला. पुढे परिस्थिती आणखी चिघळत असल्याने झेलेन्स्की यांनी ही बैठक अर्ध्यात सोडली आणि ते दुसऱ्या खोलीत निघून गेले.
दरम्यान, दोन्ही नेत्यांमधला हा संपूर्ण वाद ऑन कॅमेरा झाल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अनेक नेते या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. काही देशाचे नेते युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत दिसून आले तर काही नेत्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवला.
आता दोन्ही नेत्यांमधील हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.