केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणांतर्गत भारत आता स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने पाऊल ठेवत आहे. नुकतीच भारताने चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांना ॲपल उत्पादनांसाठी इलेक्ट्रॉनिक साहित्याची निर्यात सुरु केली आहे.
खरं तर एक काळ असा होता जेव्हा भारत या देशांकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात करत होता. मात्र, आता चित्र बदल्याचे दिसत आहे. जो देश सर्वात मोठा आयातदार होता तोच देश आता निर्यात करत आहे.
चीन आणि व्हिएतनामसारख्या देशांना मॅकबुक, एअरपॉड्स, वॉच, पेन्सिल आणि आयफोन यासारखी ॲपल उत्पादने तयार करण्यासाठी भारताकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात केली जात आहे.
सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे केंद्र बनत असून, हा विकास भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. असे उद्योग तज्ञांचे मत आहे. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आपले स्थान बळकट करत आहे व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून आपली ओळख वाढवत आहे. असेही उद्योग तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
भारत या दोन्ही देशांना करत असलेल्या निर्यातीद्वारे आता इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून आपली पकड मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल ठेवत आहे.
दरम्यान, भारत 2030 पर्यंत 35 ते 40 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात करण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल, असा विश्वास देखील उद्योग तज्ञांनी व्यक्त केला आहे.
मदरसन ग्रुप, जबील, एक्वोस आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्ससारखे अनेक ॲपल पुरवठादार आता आयपॅड वगळता ॲपलच्या सर्व उत्पादनांसाठी इलेक्ट्रॉनिक घटक तयार करत आहेत. हे सर्व घटक एकत्र करून ते असेंब्लीसाठी चीन आणि व्हिएतनामला पाठवले जात आहेत.
उत्पादन घटकांना पाठबळ देण्यासाठी आणि निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.
ॲपलने आतापर्यंत केवळ भारतात आयफोनचे उत्पादन केले आहे. पुढे लवकरच एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करण्याची योजना आहे. असे झाल्यास भारत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपली पकड मजबूत करेल तसेच अधिकाधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात त्यांचे उत्पादन तळ उभारण्यासाठी आकर्षित होतील. ज्यामुळे देशाची निर्यात क्षमता आणखी वाढेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील.