गेल्या काही दिवसात राज्यात उन्हाचा तडाका वाढला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात ऊन जाणवू लागले होते. आता राज्यभरात उन्हाचा पारा चढला असून, पुढील काही दिवसात ऊन वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे मात्र, दिल्लीत नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडला असून, दिल्लीत थंडावा जाणवत आहे. अशातच दिल्लीतील तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागच्या मते, दिल्लीत आज दिवसभर मध्यम पावसासह ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, पंजाब आणि हरियाणामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, याठिकाणी देखील नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
दिल्ली व्यतिरिक्त उत्तर भारतातील बर्याच भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा परिणाम दिसून येत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमध्ये बर्फामुळे थंडी वाढली आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधील चमोली-बद्रीनाथ महामार्गावर हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यादरम्यान, रस्ता बांधकामाच्या कामात गुंतलेले ५७ कामगार अडकले आहेत. यामध्ये १० जणांना वाचवण्यात आले. उर्वरित ४७ जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी, हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये सतत पावस पडत असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.