विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या याशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.
यंदाचे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. कारण या अर्थसंकल्पात विरोधकांकडून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जातील. संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट बलात्कार प्रकरण आणि राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यस्था यावरुन विरोधक सरकारला घेरताना दिसतील.
तसेच राज्यातील योजनांचा मुद्दा देखील या अधिवेशनात मांडला जाईल. राज्यातील सर्वात चर्चेतील योजना लाडकी बहीण योजनेबाबत देखील या अधिवेशनात मुद्दा उचलला जाईल. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार का? अशा चर्चा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर अधिवेशात राज्य सरकराकडून स्पष्टीकरण देण्यात येईल. दरम्यान, या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबाबत देखील चर्चा होणार आहे.
आजच्या अधिवेशनात उपस्थित केले जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असेही आश्वासन राज्य सरकराकडून देण्यात आले आहेत.