विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या याशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. जेव्हा ते विधिमंडळात हातात बेड्या घालून पोहोचले. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आला की जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या का घातल्या?
यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘आपल्या इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्टच अस्तित्वात राहिलेली नाही. आज जे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त करत आहेत, बोलत आहेत त्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. संविधानानं प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. तो आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो शाबूत राहिला पाहिजे. त्यासाठीच मी या बेड्या घालून आलो आहे असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुढे ते म्हणले, ‘अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून भारतीयांवर अत्याचार सुरू झाले आहेत. ट्रम्प सरकारने भारतीयांना व्हिसाबाबत केलेलं नवं धोरण अन्यायकारक आहे. त्यामुळे अनेक भारतीयांचे संसार उध्वस्त होण्याची शक्यता आहे. दोन विमान भरून त्यांनी भारतीयांना अमेरिकेतून परत आपल्याकडे पाठवून दिलं. त्यांच्या हातात बेड्या घातल्या. पायात साखळदंड बांधले. हे अपमानास्पद आहे. ही खालच्या दर्जाची वागणूक आहे. आपण यावर बोललो पाहिजे, त्यासाठी मी या प्रतीकात्मक बेड्या घातल्या आहेत. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.