विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. राज्य सरकारच्या सर्वात चर्चेत आलेल्या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकराने सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळालेले नाहीत. आणि म्हणूनच महिलांच्या मनात या योजनेबाबत धडधड वाढली होती. मात्र, आता या योजनेबाबत दिलासादायक बातमी समोर येत आहे.
महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्च रोजी राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना खास गिफ्ट देण्यात येणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हफ्ता एकत्रितपणे 8 मार्चला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे 8 मार्चला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना एकूण तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.
5 मार्चपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे एकत्र ८ मार्चला खात्यात मिळतील, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या निकषांत न बसणाऱ्या अनेक महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरू आहे. ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. मात्र, लवकरच पडताळणीचे काम पूर्ण केले जाईल आणि अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल. अशी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिली आहे.