राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धंनजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. आज अखेर मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी काढलेले फोटो काल आरोपपत्रातून समोर आले होते. या आरोपपत्रातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची महत्वाची माहिती समोर आली. या बैठकीत धनंजय मंडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते.
सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण जसं-जसं उलगडू लागलं तसं-तसं यामागील मुख्य सूत्रधाराचं नाव म्हणजेच वाल्मीक कराडचं नाव समोर येऊ लागलं. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा असल्याचे खुद्द मुंडे यांनीच सुरुवातील सांगितले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती तसेच वाल्मिक कराड आणि मुंडे यांचे आर्थिक संबंध देखील असल्याचे पुरावे आमदार सुरेश धस, आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिले होते. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीनच जोर धरू लागली होती.
दरम्यान, बीडचे सरपंचा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडेंवर आरोप झाल्यापासून महायुती सरकारला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. अशातच काल पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे माहिती समोर आली होती.