परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, काल जयशंकर लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी काश्मीर प्रकरणाबद्दल मोठं विधान केलं आहे. यावेळी जयशंकर यांनी पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकवलेल्या काश्मीरबाबत वक्तव्य केलं आहे.
लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये कार्यक्रमात जयशंकर यांना काश्मीरबाबत प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काश्मीरच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपले संबंध वापरू शकतात का? अशा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये एक अनोखा संबंध आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला काश्मीरचा भाग भारतात सामील होताच जम्मू -काश्मीरचे सगळे प्रश्न सुटतील. तसेच जम्मू जम्मू-काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता नांदेल.’
यावेळी ते म्हणाले की, ‘जम्मू -काश्मीरमध्ये शांतता आणण्यासाठी तीन टप्प्यात प्रक्रिया स्वीकारली गेली आहे.’
जयशंकर म्हणाले की, ‘आम्ही काश्मीरमधील बहुतेक समस्या सोडवल्या आहेत. माझा विश्वास आहे की कलम 370 काढून टाकणे ही पहिली आमची पायरी होती. यानंतर, काश्मीरमध्ये आर्थिक क्रियाकलाप आणि सामाजिक न्यायाची जीर्णोद्धार ही दुसरी पायरी होती. उच्च मतदानाच्या टक्केवारीसह यशस्वीरित्या निवडणूक ही तिसरी पायरी होती. आता आम्ही फक्त पाकिस्तानने बेकायदेशीरपणे घेतलेला काश्मीरचा भाग परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेव्हा तो भाग भारतात परत येईल. तेव्हा काश्मीरची समस्या पूर्णपणे संपेल.’ असं जयशंकर म्हणाले आहेत.