पाकिस्तानमध्ये लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने स्विकारली आहे. या हल्ल्यात 90 पाकिस्तानी लष्करी जवान मारल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे. तर पाकिस्तानी लष्कराने फक्त ११ सैनिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे. तर २१ जण जखमी झाले आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीचे एक निवेदन सादर करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानी लष्कराचा ताफा क्वेट्टाहून तफ्तानला जात होता. तेव्हा हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यात सात बस आणि इतर वाहनांचा समावेश होता. प्रथम हल्लेखोरांनी एका बसला लक्ष केले. या बसवर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. तर दुसऱ्या बसवर बसवर गोळीबार करण्यात आला.
हल्ल्यानंतर बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला चारही बाजूने घेरले आणि सैनिकांवर गोळीबार सुरु केला, या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.
दुसरीकडे पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, “क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. सात बस आणि दोन वाहनांचा समावेश असलेल्या या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. एका बसला आयईडीने भरलेल्या वाहनाने धडक देण्यात आली, कदाचित हा आत्मघाती हल्ला असेल, तर दुसऱ्या बसला रॉकेटने चालवलेल्या ग्रेनेड्सने लक्ष्य करण्यात आला. या हल्ल्यात ११ सैनिकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाले आहेत. असं पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.