अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड सध्या भारत दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महत्त्वपूर्ण सुरक्षा आणि गुप्तचर परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. ही परिषद दहशदवाद्यांना तोंड देण्यासाठी व गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी महत्वाची मानली जात आहे. या परिषदेत अनेक देश सहभागी झाले आहेत.
अमेरिकेत ट्रम्प सरकार परतल्यानंतर भारताला भेट देणाऱ्या गॅबार्ड या पहिल्या उच्चस्तरीय अधिकारी आहेत. गॅबार्ड यांच्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स पुढील महिन्यात भारताला भेट देऊ शकतात, यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
तुलसी गबार्ड तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या अनेक महत्वाच्या बैठकींना हजेरी लावणार आहेत.
तसेच या दौऱ्यात त्या रायसीना संवादाला देखील संबोधित करणार आहेत. रायसीना संवाद ही वार्षिक भू-राजकीय परिषद आहे. यात जगभरातील नेते आणि तज्ञांचा समावेश असतो. या परिषदेत जागतिक समस्यांवर चर्चा केली जाते. गबार्ड या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गेल्या महिन्यात वॉशिंग्टन दौऱ्यात गॅबार्ड यांची भेट घेतली होती. या बैठकीत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशांमधील सुरक्षा आणि गुप्तचर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने गॅबार्ड यांचा भारत दौरा महत्वाचा मानला जात आहे.