केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खलिस्तानी फुटीरतावादी संघटना शीख फॉर जस्टीसच्या अमेरिकी भूमीवरील कारवायांबाबत तुलसी गबार्ड यांच्याकडे चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी या संघटनेला दहशदवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावे तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सुरक्षा संबंधांना चालना देण्यावर भर देण्यात आला.
तसेच बैठकीत संरक्षण आणि सुरक्षा संबंध वाढवण्याच्या मार्गांवर देखील चर्चा झाली. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले की, ‘नवी दिल्लीत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांना भेटून आनंद झाला. भारत-अमेरिका भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली आहे.’
तुलसी गबार्ड तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. राजनाथ सिंह यांची भेट घेण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली होती. डोवाल आणि गॅबार्ड यांच्यातील बैठकीत गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्यावर मुख्य चर्चा झाली.
दरम्यान, शीख फॉर जस्टिस ही एक अमेरिकन संघटना आहे जी भारताकडे खलिस्तान नावाच्या वेगळ्या शीख राज्याची मागणी करत आहे. भारत सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा (UAPA) अंतर्गत 2019 मध्ये शीख फॉर जस्टिस संघटनेवर बंदी घातली होती. दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांना प्रोत्साहन देणारा फुटीरतावादी गट म्हणूनही या संघटनेला संबोधण्यात आले आहे.