पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही. पोलिसांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत होते, अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला झाले हे अत्यंत निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. तसेच पोलिसांवर हल्ल्या करणाऱ्यांना कारवाईचा इशारा देखील दिला आहे.
काल रात्री नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक जाळपोळ झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिस येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला. या सगळ्या प्रकरणात एकूण 33 पोलीस जखमी झाले असून. यामध्ये 3 उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने देखील हल्ला करण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रतिक्रिया देत राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुघल बादशाह औरंगजेब याचा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तिथून हटवण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याचदरम्यान, विश्व हिंदू परिषदेने नागपुरात मोर्चा काढला होता. या मोर्चात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. आणि दोन गटांमध्ये तुफान दगफेक झाली. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली. शहरात शांतात राखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु असताना अनेकांनी पोलीस पथकावर देखील हल्ला केला. ज्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.