न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी व लॅक्सन यांनी सोमवारी संयुक्तपणे तीन दिवसीय रायसीना संवादाचे उद्घाटन केले. या परिषदेत 125 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवसांचा रायसीना संवाद १९ मार्चपर्यंत चालेल.
यावर्षी रायसीना संवाद परिषदेची थीम “कालचक्र – लोक, शांती आणि ग्रह” आहे. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक विचारवंतांनी या परिषदेत हजेरी लावली आहे.
या परिषदेत मंत्री, माजी राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख, लष्करी कमांडर, उद्योगपती, तंत्रज्ञान नेते, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, धोरणात्मक बाबींवरील अभ्यासक, आघाडीच्या थिंक टँकमधील तज्ञ आणि तरुण यांचा समावेश आहे.
काय आहे रायसीना संवाद?
रायसिना संवाद ही भारतातील नवी दिल्ली येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 मध्ये स्थापन झाल्यापासून, रायसीना संवाद ही भू-राजकीय आणि भू-अर्थशास्त्रावरील भारताची प्रमुख परिषद म्हणून उदयास आली आहे. जी आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. या बैठकीत विविध देशांतील उच्चस्तरीय अधिकारी, धोरणकर्ते, उद्योग जगतातील नेते आणि पत्रकार सहभागी होतात.
रायसीना संवाद परिषदेचा उद्देश काय?
जगातील देशांमधील समन्वय राखणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाद्वारे भारत सरकार आंतरराष्ट्रीय संबंध आणि समस्यांबाबत आपले धोरण जगासमोर स्पष्ट करते. गेल्या दहा वर्षांपासून सुमारे 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाद्वारे भारत आपली राजनैतिक क्षमता वाढवत आहे.
दरवर्षी, राजकारण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातील नेते जगाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि समकालीन बाबींच्या विस्तृत श्रेणीवर सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी नवी दिल्लीत एकत्र येतात.