गेल्या नऊ महिन्यापासून अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ प्रवास फक्त ८ दिवसांचा होता. मात्र, अंतराळयानात असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेली नऊ महिने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर अंतराळातच अडकले होते. अखेर ते आता पृथ्वीवर परतणार आहेत.
दरम्यान, भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना भारत भेटीचं आमंत्रण देखील दिले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
As the whole world waits, with abated breath, for the safe return of Sunita Williams, this is how PM Sh @narendramodi expressed his concern for this daughter of India.
“Even though you are thousands of miles away, you remain close to our hearts,” says PM Sh Narendra Modi’s… pic.twitter.com/MpsEyxAOU9— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) March 18, 2025
पत्रात काय म्हणाले मोदी?
“मी तुम्हाला भारतीयांच्यावतीने शुभेच्छा देतो. आज मी प्रसिद्ध अंतराळवीर माईक मॅसिमो यांना एका कार्यक्रमात भेटलो. या संभाषणादरम्यान तुमचे नाव समोर आले आणि आम्ही तुमच्या कामाचा आम्हाला किती अभिमान आहे, यावर चर्चा केली. या चर्चेनंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून रोखू शकलो नाही. तसेच मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना त्यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भेटलो, तेव्हा मी नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल विचारलं होतं. भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान वाटतो
तुमची प्रेरणादायी जिद्द आणि परिश्रम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तुम्ही हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या खूप जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मिशनच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर परतल्यावर आम्ही तुमचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत. तुम्हाला सुरक्षित परतीसाठी शुभेच्छा”, असं पंतप्रधान मोदींनी पात्रात लिहिलं आहे.