China Taiwan War: एकीकडे रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. तर आता दुसरीकडे आशिया खंडातही चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. नुकतेच चीनने तैवानच्या आजूबाजूला नौदल आणि हवाई जहाजे वाढवली आहेत. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता वाढली आहे. अर्थातच यामुळे चीन आणि तैवान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वाढू लागली आहे.
मंगळवारी (दि. १९ मार्च रोजी) तैवान देशाने माहिती दिली आहे की, तब्बल 59 चिनी विमाने तैवानच्या बेटाजवळ पोहोचली आहेत. २०२४ च्या ऑक्टोबरमध्ये चीनने तैवानच्या दिशेने एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने पाठवली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच चीनने इतक्या मोठ्या प्रमाणात विमाने पाठवली आहेत.
चीनने अलिकडच्या काही वर्षांपासूनच तैवानभोवती लढाऊ विमाने आणि नौदल जहाजांची तैनाती वाढवल्याचे दिसते. हे सर्व तैवानवरती दबाव आणण्यासाठी केले जात आहे, असे म्हटले जाते. महत्वाचे म्हणजे तैवानने असाही दावा केला आहे की, चीनने हेरगिरी, सायबर हल्ले आणि चुकीच्या माहितीचा वापर करून तैवानचे संरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तैवाननेही चीनच्या या हालचालींना गंभीर्याने घेतले असून तैवान आपल्या संरक्षण क्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहे.
दरम्यान, चीन तैवानला आपल्या देशाचा एक भाग मानतो त्यामुळे तैवान पुन्हा चीनमध्ये विलीन व्हावा अशी चीनची इच्छा आहे. अर्थातच तैवानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यास चीनचा विरोध असल्याने चीन तैवानवरती दबाव आणते. चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाल्यास संपूर्ण जगावर आर्थिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतात.