हमीरपूरचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खलिस्तान चळवळीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि या समस्येवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी, ते हरोली मंडळ भाजपच्या प्रास्ताविक सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, जिथे त्यांनी हिमाचल प्रदेश सरकारवर टीका केली आणि अलीकडेच सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पाला दिशाहीन ठरवले.
हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना ठाकूर यांनी गेल्या तीन वर्षांपासून आश्वासने पूर्ण करण्याऐवजी केवळ केंद्र सरकारला दोष देण्यातच लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “राज्य सरकारकडे लोकांना दाखवण्यासाठी काहीही ठोस नाही. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने १० हमी दिल्या होत्या, पण आता त्यांच्याच नेत्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यातील महिला आणि तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ठाकूर यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की, “सरकारने १८ ते ५९ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज महिलांना विश्वासघात झाल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणे पाच लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासनही अपूर्ण राहिले आहे.” त्यांनी राज्यातील विविध माफियांच्या वाढत्या प्रभावावर टीका केली आणि त्यांच्या कारवायांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे असे प्रतिपादन केले.
खलिस्तानच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना, ठाकूर यांनी पंजाब आणि हिमाचलमधील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांच्या प्रयत्नांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “जर पंजाब सरकारने सुरुवातीपासूनच हा मुद्दा गांभीर्याने घेतला असता तर परिस्थिती इतकी बिकट झाली नसती.” त्यांनी पंजाबमधील वाढत्या असुरक्षिततेवर प्रकाश टाकला आणि म्हटले की, “आज बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित वाटत नाही. अशा परिस्थिती शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारने निर्णायकपणे कारवाई केली पाहिजे.” ठाकूर यांनी भाजप कार्यकर्त्यांना जनतेशी त्यांचे संबंध मजबूत करण्यास आणि पक्षाच्या धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.