पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील वारजे माळवाडीहून व्योम ग्राफिक्सला कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसमध्ये अचानक आग लागुन या आगीत चार कामगारांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले, त्यापैकी दोघे त्यापैकी दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. आग इतकी भीषण होती की चारही कामगारांना बाहेर पडता आले नाही. मात्र प्रसंगावधान दाखवून एका महिलेसह चार कामगारांनी बसमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. ही घटना बुधवारी सकाळी ७:४५ वाजताच्या सुमारास विप्रो सर्कलजवळ घडली.
शंकर कोंडिबा शिंदे (वय ६३, रा. नऱ्हे, आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा) सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) अशी मृत्यूमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत. तर, बसचालक जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रवीण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे चार कामगार जखमी असून त्यांच्यावर हिंजवडीतील रूबी हॉल रूग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींपैकी दोन जण ४० टक्क्यांहून अधिक भाजले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
हिंजवडी आयटी पार्कमधील प्रिंटिंग प्रेस कंपनी व्योम ग्राफिक्समध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालते त्यासाठी कामगारांसाठी बसची सुविधा आहे. बुधवारी बसचालक हंबर्डीकरने सकाळी ६:३० वाजता वारजे माळवाडी येथून १२ कामगारांना आणि सकाळी ७:३० वाजता चांदणी चौकातून आणखी एक कामगाराला घेतले. गाडी विप्रो सर्कल चौकात पोहोचत असताना, समोरून अचानक धूर निघाल्याने बसला आग लागली. यामध्ये चालकाच्या पायाला भाजल्याने त्याने त्वरीत गाडीच्या खाली उडी मारली. जळालेल्या चालकाने बाहेर उडी मारली आणि बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. काही क्षणात आगीने बसला वेढा घातला
बसमध्ये पुढील सीटवर बसलेल्या मंजिरी आडकर या महिलेसह चार जणांनी प्रसंगावधान राखत बसमधून खाली उडी मारली. मात्र त्यांच्या मागे असलेल्या तीन जणांना आगीची झळ बसली. तर त्यांच्या मागे असलेल्या दोघांनी पेट घेतला. या पाचही जणांनी पेटत्या अवस्थेत बसमधून खाली उडी मारली. यामध्ये दोन कामगार गंभीर भाजले. तर पाठीमागील आसनावर बसलेल्या उर्वरीत चार कामगारांना बसमधून खाली उतरायची संधीच मिळाली नाही श. त्यामुळे ते बसमध्येच अडकले. त्यांनी बसचा पाठीमागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर काही क्षणात आगीने चौघांनाही आपल्या कवेत घेतले. त्यात गुदमरून आणि होरपळून या चारही कामगारांचा मृत्यू झाला.