गाझा येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तर गाझा पट्टीत इस्रायली हवाई हल्ल्यात किमान १६ पॅलेस्टिनी ठार झाले असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बुधवारी बेत लाहिया येथील सलाटिन भागात हा हल्ला झाला, जिथे पूर्वीच्या इस्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी शोक सभा आयोजित करण्यात येत होती. असे सगळे असताना इस्रायली लष्कराने मात्र या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हा हवाई हल्ला गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायली लष्करी कारवाईचा एक भाग आहे, जो हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करतो. मंगळवारपासून आतापर्यंत ४३० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याचे वृत्त आहे, ज्यात १७० हून अधिक मुले आणि ८० महिलांचा समावेश आहे. १९ जानेवारीपासून सुरू असलेली युद्धबंदी आता संपुष्टात आली आहे.इस्रायलचे संरक्षण मंत्री, इस्रायल काट्झ यांनी सांगितले की अलीकडील हवाई हल्ले “फक्त सुरुवात” आहेत, आगामी काळात आणखी तीव्र हल्ले होऊ शकतात,असा इशारा देत त्यांनी यावरही जोर दिला की इस्रायल आपली “रणनीतिक उद्दिष्टे” पूर्ण होईपर्यंत कारवाई सुरू ठेवेल.
दरम्यान, गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की रुग्णालये गर्दीने भरलेली आहेत आणि आपत्कालीन सेवा तसेच मृतांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांना तोंड देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गाझामधील मानवीय संकट आणखी बिकट होत चालले आहे, हमासच्या मीडिया ऑफिसने म्हटले आहे की इस्रायली नाकेबंदी आणि सीमा बंद झाल्यामुळे वीस लाख लोकांना अन्नाची तीव्र टंचाई आणि आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. तसेच गाझातील अनेक बेकरी बंद कराव्या लागल्या आहेत, ज्यामुळे ब्रेडची कमतरता निर्माण झाली आहे.या सगळ्या गोष्टींचा विचार करून कार्यालयाने पुढील त्रास आणि उपासमार टाळण्यासाठी सीमा त्वरित उघडण्याची विनंती केली आहे,