Jaykumar Gore: सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरेंवर(Jaykumar Gore) एका महिलेने गंभीर आरोप केल्याने मागील काही वर्षांपासून गोरे सातत्याने चर्चेत येत आहेत. या प्रकरणात वारंवार आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र आता जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी(दि. २१ मार्च) रोजी सकाळी आठ वाजता सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संबंधित महिलेला अटक केली आहे. या महिलेने जयकुमार गारेंचे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटींची मागणी केली होती. यातील एक कोटींची रक्कम स्विकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.
जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये असताना, २०१६ मध्ये गोरेंनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते, असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी जयकुमार गोरेंना १० दिवस जेलमध्येही जावे लागले होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. मात्र या महिलेने जानेवारी २०२५ मध्ये, तिला या प्रकरणी निनावी धमकीचे पत्र आल्याचा दावा केला होता. त्यामुळे तिने पुन्हा जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा हे प्रकरण चर्चेत येत होते.
विशेष म्हणजे गोरे यांनी या महिलेने त्यांच्याकडे खंडणी मागितल्याची तक्रार यापूर्वीच केली होती. त्यानंतर या महिलेने आपल्यावर दबाव आणण्यासाठी जयकुमार गोरेंनी खंडणी मागितल्याची खोटी तक्रार केल्याचा दावा, केला होता. मात्र आता तिला एक कोटींची खंडणी स्विकारताना अटक झाल्याने विविध चर्चांणा उधाण आले आहे.