Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच अनधिकृतपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा त्यांनी उगारला आहे. त्यांनी आतापर्यंत अमेरीकेतील अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशी पाठवले आहेत. त्यातच ट्रम्प यांनी आता आणखी चार देशांमधील स्थलांतरितांना दणका दिला आहे.
शुक्रवारी( दि. २२ मार्च रोजी) ट्रम्प यांच्या गृह सुरक्षा विभागाने घोषणा केली आहे की, क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या देशांमधून आलेल्या पाच लांखाहून अधिक स्थलांतरितांना दिलेले कायदेशीर संरक्षण रद्द केले जाणार आहे. २४ एप्रिल २०२५ रोजी स्थलांतरितांचे कायदेशीर संरक्षण संपुष्टात येणार आहे. त्यानंतर क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या चार देशांमधून आलेल्या नागरिकांना अमेरिका सोडावे लागणार आहे.
जो बायडेन सत्तेत असताना त्यांनी, प्रति महिना ३० हजार लोकांना अमेरिकेत कायदेशीर प्रवेश दिला होता. त्यांना अमेरिकेत काम करण्याचीही परवानगी दिली होती. आता ट्रम्प यांच्या गृह सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्यांच्याकडे अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर आधार नाही, त्यांनी त्यांचा पॅरोल दर्जा संपण्यापूर्वी अमेरिकेतून निघून जावे.
ट्रम्प यांच्या या निर्णयाला अमेरीकेतील स्थलांतरितांच्या एका गटाने न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच पॅरोल कार्यक्रम सुरू ठेवण्याची मागणीही स्थलांतरितांच्या गटाने केली आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.