Nagpur violence: औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राज्यात वाद पेटल्यानंतर १७ जानेवारीला संध्याकाळी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसले. या हिसांचारानंतर नागपूरमध्ये अनेक भागांत संचारबंदी लावण्यात आली होती, अजूनही काही भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच शनिवारी(दि. २२ मार्च रोजी) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, नागपूरात दंगल घडलेल्या सर्व परिसरांमध्ये सध्या शांतता आहे. त्यामुळे येत्या काळात टप्प्याटप्प्याने संचारबंदीच्या निर्बंधात शिथीलता देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
ज्यांनी दंगल घडवली आहे, त्यांना मात्र सोडणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. ज्यांनी नागपूरमध्ये दंगल घडवली त्या सगळ्या आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करू, प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
काही लोकांच्या पोस्टमध्ये या दंगलीत बांगलादेशींचा हात असल्याच्या दावा केला जात आहे. या मुद्द्यावरती बोलताना फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात बांगलादेशी अँगल आहे की विदेशी हात आहे, हे सांगणे आता कठिण आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत असे म्हणता येणार नाही. विशेष म्हणजे सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी 104 आरोपींना अटक केली असून लवकरच उरलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.