खान यूनिस येथे इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ राजकीय नेता सलाह अल-बर्दावील ठार झाला आहे. टाइम्स ऑफ इस्रायलने हमास समर्थक माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बर्दावील यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे.
इस्रायलचा हल्ला आणि युद्धविराम भंग-
गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करत इस्रायलने ही मोठी लष्करी मोहीम राबवली. १९ जानेवारीपासून सुरू असलेला युद्धविराम अपयशी ठरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम चर्चेचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
नेतान्याहू सरकारची भूमिका-
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारने स्पष्ट केले की, हमासने ताब्यात घेतलेल्या बंदीवानांची सुटका न केल्याने आणि अमेरिकन दूत स्टीव विटकॉफ यांच्या मध्यस्थीने आणलेले प्रस्ताव फेटाळल्याने ही लष्करी कारवाई अपरिहार्य होती.नेतान्याहू यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ला हमासविरोधात हल्ले तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश गाझामधील हमासच्या लष्करी आणि प्रशासकीय यंत्रणेचा नाश करणे आहे.
युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता-
इस्रायल आता हमासविरुद्ध अधिक तीव्र कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. IDF ने यासंबंधीची ऑपरेशनल योजना सादर केली होती, ज्याला राजकीय नेतृत्वाने मंजुरी दिली आहे.युद्धविराम चर्चेतील अपयशामुळे इस्रायल आणि हमास यांच्यातील तणाव अधिकच वाढला आहे. इस्रायलने तीन-टप्प्यातील कराराच्या पहिल्या टप्प्यावर भर दिला होता, तर हमासने दुसऱ्या टप्प्यावर लक्ष केंद्रीत केले होते, जो मूळतः २ मार्चपासून सुरू होण्याची अपेक्षा होती.
बंदीवानांची अदलाबदल आणि हमासवर दबाव-
युद्धाच्या पहिल्या टप्प्यात हमासने २,००० फिलिस्तीनी कैद्यांच्या बदल्यात ३३ इस्रायली नागरिक आणि ५ थाई नागरिकांची सुटका केली होती. मात्र, अद्याप ५९ इस्रायली बंदीवान हमासच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते.इस्रायल सरकारने या पार्श्वभूमीवर लष्करी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, या युद्धाचा मुख्य उद्देश हमासला पूर्णतः नष्ट करणे आहे. तसेच, या नव्या हल्ल्यांचा उद्देश उर्वरित बंदीवानांची सुटका करण्यासाठी हमासवर दबाव आणणे हाही आहे.