राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी १९२३ मध्ये आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली अर्पण करून आपल्या संबोधनाची सुरुवात केली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि समाजाला त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
त्यानंतर दत्तात्रेयजी होसबाळे यांनी राणी अब्बक्का यांच्याविषयीच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या निवेदनाची माहिती दिली.
रा. स्व. संघाच्या सरकार्यवाहांनी भारताच्या महान महिला स्वातंत्र्यसैनिक, कुशल प्रशासक आणि निर्भय योद्धा म्हणून गणल्या गेलेल्या महाराणी अब्बक्का यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांनी उल्लाळ (दक्षिणा कन्नड, कर्नाटक) या छोट्या राज्याचे पोर्तुगीजांपासून शौर्याने रक्षण केले.
त्यांच्या योगदानाचा सन्मान करत भारत सरकारने २००३ मध्ये एक टपाल तिकिट जारी केले आणि २००९ मध्ये एका गस्ती जहाजाला त्यांचे नाव दिले. समाजाने राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या धैर्य आणि नेतृत्वापासून प्रेरणा घ्यावे, असे आवाहन दत्तात्रेयजी होसबाळे यांनी केले.
अ. भा. प्रतिनिधी सभेविषयी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यात संघ यशस्वी झाला आहे. संघ केवळ राष्ट्राला एकत्र आणण्याचे काम करत नाही तर नैसर्गिक आपत्तींदरम्यान आणि नंतर मदत आणि पुनर्वसन कार्यात सक्रियपणे सहभागी झाला आहे.
संघ यावर्षी विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण करत आहे. आधी दिलेल्या माहितीप्रमाणे, येत्या वर्षात त्याच्या कार्याचा विस्तार आणि एकत्रीकरण यावर भर देण्यात येणार आहे. संघाचा उद्देश हा मोठा टप्पा साजरा करण्याचा नसून १) आत्मनिरीक्षण करणे, २) संघाच्या कार्याला समाजाने दिलेल्या पाठिंब्यासाठी दाद देणे आणि ३) राष्ट्राच्या कार्यासाठी आणि समाजाच्या संघटनसाठी स्वतःला पुन्हा समर्पित करणे हा आहे. शताब्दी वर्षात अधिक बारकाईने, गुणात्मक आणि व्यापकपणे काम करण्याचा आम्ही संकल्प करत आहोत, असे ते म्हणाले.
बांगलादेशावरील ठरावाशिवाय, अ. भा. प्रतिनिधी सभेने रा. स्व. संघाच्या १०० वर्षांच्या शताब्दीवर संकल्प केला आहे. डॉक्टरजींनी स्थापनेदरम्यान म्हटल्याप्रमाणे, संघ कोणतेही नवीन कार्य सुरू करत नाही तर अनेक शतकांपासून सुरू असलेले व्रत पुढे नेत आहे.
पुढील विजयादशमीपासून, संघ शताब्दीदरम्यान विशिष्ट उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत:
१. शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमी २०२५ च्या दिवशी होईल, त्यात संघाच्या गणवेशातील स्वयंसेवकांचे खंड किंवा नगर स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. दरवर्षीप्रमाणे सरसंघचालक स्वयंसेवकांना संबोधित करतील, असे त्यांनी सांगितले.
२. साधारणपणे नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात “हर गाव, हर बस्ती-घर-घर” (प्रत्येक गाव, प्रत्येक परिसर आणि घरोघरी) या संकल्पनेनुसार तीन आठवड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घरोघरी संपर्क मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक शाखांकडून संघ साहित्याचे वाटप केले जाईल आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
३. सर्व मंडळे किंवा वस्तींमध्ये (परिसर) हिंदू संमेलने आयोजित केली जातील. त्यांमध्ये भेदभाव न बाळगता सर्वांच्या दैनंदिन जीवनात एकता आणि सुसंवाद, राष्ट्रकार्यात प्रत्येकाचे योगदान आणि पंच परिवर्तनात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हा संदेश दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
४. खंड/शहर पातळीवर सामाजिक सद्भाव मेळावे आयोजित करण्यात येतील. त्यांमध्ये एकरसतेने जगण्यावर भर दिला जाईल, असे ते म्हणाले. सांस्कृतिक पाया आणि हिंदू चारित्र्य न गमावता आधुनिक जीवन जगणे हा या मेळाव्यांचा विषय असेल, असेही त्यांनी सांगितले. सर्व स्तरातील लोक एकत्र आलेल्या महाकुंभाचे उदाहरण त्यांनी दिले.
५. जिल्हा पातळीवर महत्त्वाचे नागरिक संवाद आयोजित करण्यात येतील. राष्ट्रीय मुद्द्यांवर योग्य दृष्टिकोन मांडण्यावर आणि आज समाजात प्रचलित असलेल्या चुकीच्या कथा बाजूला ठेवण्यावर या कार्यक्रमांचा भर असेल, असे दत्तात्रेयजी होसबाळे म्हणाले.
६. प्रांत शाखांकडून युवकांसाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. राष्ट्र उभारणी उपक्रम, सेवा उपक्रम आणि पंच परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक कार्यक्रम १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी हाती घेण्यात येतील. स्थानिक युनिट्स गरजेनुसार या कार्यक्रमांचे नियोजन करतील, असे त्यांनी सांगितले.
वक्फ कायदा रद्द करण्याच्या हिंदू संघटनांच्या मागणीबाबत एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, वक्फकडून जमिनींवर अतिक्रमण झाल्यामुळे अनेक शेतकरी प्रभावित होतात. सरकार यावर उपाय शोधत आहे आणि चुका दूर केल्या पाहिजेत.
औरंगजेबाबद्दल ते म्हणाले की, असहिष्णुतेसाठी ओळखले जाणारे आणि या राष्ट्राच्या नीतिमत्तेचे प्रतिनिधित्व न करणारे नव्हे, तर समाज आणि राष्ट्राच्या भल्यासाठी जे आदर्श आहेत ते आपले आदर्श असले पाहिजेत. औरंगजेबासारख्यांचा विरोध हा धार्मिक नाही तर राष्ट्राच्या आणि एकतेच्या हितासाठी आहे. आपल्याला १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले असले तरी, आजही मानसिक वसाहतवाद हे एक वास्तव असून मनाला वसाहतवादमुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे.
धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सरकारांच्या अशा कृती असंवैधानिक आहेत त्यामुळे न्यायालयांनी त्या अनेक वेळा बाजूला सारल्या आहेत. अशा राजकीय हालचाली करणारे कोणीही हे संविधान निर्मात्यांच्या उद्देशाविरुद्ध जात आहेत, असे ते म्हणाले.
सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीबद्दल, विशेषतः मणिपूरमधील परिस्थितीबद्दल, त्यांनी केलेल्या निवेदनाबाबत ते म्हणाले की, सरकारने त्यांच्या मूल्यांकनाच्या आधारे काही पावले उचलली आहेत. संघाने फक्त एवढेच म्हटले आहे की, या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि मणिपूरमधील लोकांचे जीवन सामान्य होण्यासाठी आणि सुसंवादाने जगण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत.
गेल्या १०० वर्षांतील संघाच्या अजेंड्याबाबत एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, हिंदू समाजाचे पुनरुज्जीवन हाच आमचा अजेंडा आहे. हिंदू समाजाचे संघटन करणे हा संघाचा अजेंडा आहे. अस्पृश्यतेसारख्या अनेक अंतर्निहित दोषांमुळे हे एक महाकठीण काम होते. ते साध्य करण्यासाठी शाखा तसेच एकसंध समाज आणि राष्ट्रासाठी सर्वांना एकत्र आणणाऱ्या आपल्या देशव्यापी उपक्रमांद्वारे संघ हे काम दृढपणे करत आहे.