कर्नाटक राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्यावरून आज, सोमवारी संसदेत प्रचंड गोंधळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच, कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणावरून ट्रेझरी बेंचच्या सदस्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज पहिल्यांदा दुपारी 12 आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यासोबतच राज्यसभेचे कामकाज देखील दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
काँग्रेस मुस्लिम आरक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले संविधान का बदलत आहे? याचे उत्तर द्यावे, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत. यावर उत्तर देताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, देशाचे संविधान बाबासाहेबांनी बनवले. त्याला कोणीही बदलू शकत नाही. ते सुरक्षित राहावे यासाठी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा काढली. आपण संविधान बदलणार आहोत असे कोणी म्हटले? यावर किरण रिजिजू म्हणाले की, बाबासाहेबांनी नाकारलेले मुस्लिम लीगचे धोरण राबवून काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांची प्रतिष्ठा कलंकित केली आहे.
किरण रिजिजू यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेले विधान वाचून दाखवले आणि काँग्रेस अध्यक्षांना कारवाई करण्याचे आव्हान दिले. गदारोळानंतर अध्यक्षांनी12 वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच किरेन रिजिजू यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर झालेल्या गोंधळानंतर पुन्हा लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
अश्या प्रकारचे मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रयत्न याआधीही काही राज्यामध्ये झाला होता. काही ठिकाणी हे मंजूर झाले तर काही राज्यांमध्ये अद्याप कोर्टामध्ये याबाबत निर्णय प्रलंबित आहे.
केरळ ओबीसींसाठी ३०% आरक्षण, यात मुस्लिमांना नोकऱ्यांत ८% आणि उच्च शिक्षणात १०% कोटा.
तामिळनाडू मागास वर्गातील मुसलमानांना ३.५% आरक्षण देतेय. यात मुस्लिम समुदायातील ९५% जातींचा समावेश
बिहार ओबीसींना ३२% आरक्षण दिले गेले. यात मुस्लिम समुदायाला ४% आरक्षणाची तरतूद केली.
आंध्र प्रदेश मुस्लिम समुदायाला ५% आरक्षणाचा प्रयत्न केला, पण कोर्टाने हा निर्णय रद्द केला.
पश्चिम बंगाल ओबीसीत काही मुस्लिम जातींचा समावेश केला आहे, परंतु कोणताही वेगळा कोटा दिला नाही.
उत्तर प्रदेश २००५ मध्ये मायावती सरकारने १८% मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव मांडला, पण कोर्टाने स्थगिती दिली.