Nepal News: आजही जगात अनेक असे देश आहेत, जिथे घटनात्मक राजेशाही आहे. नेपाळमध्येही पूर्वी राजेशाही होती. मात्र २००८ मध्ये नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली आणि नेपाळमध्ये संघीय लोकशाही आली. मात्र सध्या नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणण्याबाबत निदर्शने सुरू आहेत. आता नेपाळ हा एकमेव देश बनला आहे जिथे लोकशाही आल्यानंतर जनतेला पुन्हा राजेशाही पाहीजे.
नुकतीच नेपाळमध्ये माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी राजधानी काठमांडूत रॅली काढली होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता भारतावर गंभीर आरोप केला आहे. ओली यांच्या कम्युनिस्ट पक्षाची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दावा केला आहे की, देशातील राजेशाही समर्थक चळवळीत भारताची भूमिका आहे. केपी शर्मा ओली २६ मार्च रोजी हा मुद्दा त्यांच्या संसदेत मांडणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच या आंदोलनात भारताची भूमिका आहे, याबाबत ओली पूरावे सादर करणार असल्याच्याही चर्चा आहेत. केपी शर्मा ओली यांच्या या दाव्यानंतर भारत आणि नेपाळ संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे, त्यामुळे मागे वळून पाहू नका. आपल्यासमोर अनेक आव्हाने येतील, परंतु आपल्याला लोकशाहीच्याच मार्गावर चालायचे आहे, रस्त्यात कितीही काटे आले तरी त्यांना बाजूला सारून आव्हानांना सामोरे जायचे आहे, लोकशाही हाच आपला एकमेव महामार्ग आहे, असे मत ओली यांनी महिला नेतृत्व शिखर परिषदेदरम्यान व्यक्त केले.