Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा नागपूरमधील पत्रकार प्रशांत कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरार आहे. पोलिसांची शोध मोहिम सुरू होती मात्र तो पोलिसांना चकवा देत होता.मात्र आज ( २४ मार्च) रोजी त्याला तेलंगणातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली आहे. तेलंगणामध्ये अटकेची नोंद झाल्यानंतर त्याला कोल्हापूर पोलिस ताब्यात घेणार आहेत. कारण इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार कोरटकरला आता कोल्हापूर पोलिस ठाण्यात आणले जाणार आहे.
प्रशांत कोरटकरने जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयाकडे अर्ज केला होता. कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयातही अर्ज केला होता. पण उच्च न्यायालयानेही त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अटकेच्या भितीने कोरटकर फरार झाला होता. दोन दिवसांपूर्वी तो दुबईला गेल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. मात्र आता त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रशांत कोरटकरने 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ च्या आसपास इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.