Prashant Kortakar: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज ( २४ मार्च) तेलंगणातून अटक करण्यात आले आहे. कोरटकरला अटक केल्यानंतर आता इंद्रजीत सावंत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
कोरटकरला अटक करण्यात आली ही समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे. मात्र गेली महिनाभरापासून कोरटकरला वाचविण्याचे प्रयत्न झाले असे वाटतेय, असे म्हणत इंद्रजित सावंत यांनी शंका उपस्थित केली आहे. जर कोरटकरला वाचविण्याचे प्रयत्न झाले असतील तर संबंधितांचीही चौकशी करून कारवाई करावी, असेही इंद्रजित सावंत म्हणाले.
दहा ते पंधरा वर्ष महापुरुषांचा विचार मांडणाऱ्या लेखक, इतिहास अभ्यासकांना सोशल मीडियावर ठराविक विचारसरणीच्या लोकांकडून लक्ष्य केले जाते. त्यामुळे विचारवंतांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विचार रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रवृत्तीला संघटित होऊन लढा दिला पाहिजे. तरच प्रशांत कोरटकरसारखी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या मातीत डोके वर काढणार नाही, असेही इंद्रजित सावंत यावेळी म्हणाले.
दरम्यान, प्रशांत कोरटकरने जामिनासाठी कोल्हापूर न्यायालयाकडे अर्ज केला होता. कोल्हापूर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयातही अर्ज केला होता. पण उच्च न्यायालयानेही त्याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अटकेच्या भितीने कोरटकर फरार झाला होता. दोन दिवसांपूर्वी तो दुबईला गेल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. मात्र आता त्याला तेलंगणामधून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.